Wednesday, November 26, 2014

बरे वाटले....!


नकार-होकारावर कधीचे शब्दही होते अडले,
आसवांतून अखेर बोलून गेली... बरे वाटले....!


सव्वा रुपया, चार फुले... अन् नारळही नाही!
स्वस्तामधला सौदा..."माऊली"!... बरे वाटले...!


घाव केले हृदयावर त्यांनी... शब्दांचेच होते,
कट्यार नव्हती बगलेखाली... बरे वाटले....!


दारामध्ये ताटळलो कधीचे दोघे आम्ही,
श्वानाला तरी त्या भाकरी मिळाली... बरे वाटले...!


फुलली 'कमळ'दले अशी 'शरदा'त अचानक...
जादू कोणती रातोरात झाली?... बरे वाटले....!


असह्य होते शिवार जळते एकट्यानेच पहाणे,
मृत्यो!..तव साथ मिळाली....बरे वाटले...!


दुध-दह्याच्या अभिषेकांची 'सावळी' पाऊले,
आज माझ्या आसवांनीच न्हाली... बरे वाटले...!


नुसतेच पाहतो व्यवहार जगाचे 'अवि' उघड्या डोळा,
खदखद फक्त कवितेत निघाली...बरे वाटले...!


- अविनाश