Monday, August 18, 2008

भूल

भूल

आज का काही कळेना, अडखळते पाऊल आहे
शांत शांत सागरामध्ये, वादळाची चाहूल आहे

आप्त माझे तुझीया पायी, मीच का रे पायदळी?
विनवते प्रभुला किती ते, केविलवाणे फुल आहे

आज अडला श्वास देही, प्राण कंठी दाटले
तमा कुणाला जो तो, स्वत:मध्ये मश्गूल आहे

जाळुनी जन्मभरी स्वत:ला, भाजली रे भाकरी
प्रितभरल्या फुंकरीला तरसे, मी विझणारी चूल आहे...

अर्पिले सर्वस्व तुजला, वसविले मनमंदिरी
हात नाही जोडले, हीच माझी भूल आहे?

- अवि

Saturday, April 26, 2008

व्यथा

व्यथा व्यर्थ मनीच्या, कुणा मी सांगणार नाही
हरलेला डाव आता, पुन्हा मी मांडणार नाही

वेडा म्हणा कुणी, मज म्हणा कुणी अभिमानी
पायी उगाच तुमच्या, असा मी रांगणार नाही

घरभेदी म्हणती आप्त, या विभिषण धर्माला
रक्त तुजसाठी तरी, रावणा, मी सांडणार नाही

तुडवतील सहजा सहजी, ते कोवळ्या भावनांना
लक्तरे वेदनांची वेशी, अता मी टांगणार नाही

भोगीन भोग सारे, मी पुण्य सारे विसरुनी
सावळ्या हरीशी तरी, बघा, मी भांडणार नाही

--अवि

Monday, March 17, 2008

प्रेमदिन

प्रेमदिन

रम्य संध्याकाळच्या आपल्या भेटी
सखे मला अजुनही आठवतात
तुझे ते निरागस हसु आठवताना
हळुच माझा गळा दाटवतात

हसत हसत विचारलेले तुझे प्रश्न
ह्रुदयात प्रेमाचे काहुर माजवतात
तिरपा कटाक्ष टाकत दिलेली उत्तरे
तुला अजुनही तितकेच लाजवतात?

थरथरणारे तुझे धुंद श्वास
भोवताली माझ्या जाणवत रहातात
अन राहुन राहुन तुझ्या आठवाने
पापण्यांच्या कडा पाणवत रहातात

तुझ्या प्रितीची मुक साद
सखे मला कळते आहे
माझेही वेडे मन
तव भेटीलागी तळमळते आहे

शहरांत असो अंतर कितीही
मनाने आणखी जवळ येऊया
आजचा हा प्रेमदिन सखे
प्रेमानेच आपण साजरा करुया....
आजचा हा प्रेमदिन सखे
प्रेमानेच आपण साजरा करुया....

--- अविनाश