आताशा आरशात पाहाणं मी बर्याचदा टाळतो, कारण...
समोर काय दिसणार याचा चोरटा हिशेब,
मनाने आधीच कुठेतरी करुन ठेवलेला असतो...
तरीही व्हायचं तेच होतं,
नेहमीच्याच सवयीनं, अनावधानानं
आरशाकडे लक्ष जातं...
आणि मग समोर
नेहमीचंच चित्र उभं रहातं...
दिसतोच शेवटी तो वठलेला एकलकोंडा वृक्ष...
एकेकाळच्या भव्यतेच्या खुणा
अंगाअंगावर मिरवणारा...
आणि आता स्वतःच्या अस्तित्वासाठीच
केविलवाणी झुंज देणारा...
त्याच्या अंगाखांद्यांवर वाढलेल्या पक्षानंही
आता दुसरीकडे बिर्हाड मांडलंय..
आणि त्यानंही एव्हाना सवयीनं,
ते हताशपणे स्विकारलंय....
खुद्द धरणीमातेनंच झिडकारल्याचा घाव मात्र
त्याच्या उरल्यासुरल्या फांद्यांतून,
शेवटर्यंत सलणार बहुतेक...
घायाळलेलं मन त्याचं,
एकाकीपणाच्या सरणावर,
शेवटपर्यंत जळणार बहुतेक...
आणि,
तरीही सोबतीच्या आशेने,
अस्तित्वाच्या मृगजळामागे तो,
शेवटपर्यंत पळणार बहुतेक....
........
...........
आताशा आरशात पाहाणं मी कटाक्षानं टाळतो, कारण...
जर तो वृक्ष पुन्हा दिसलाच नाही, तर....
माझे अस्तित्वच उन्मळून पडेल,
सोबत्याविना सरणावर एकाकी असल्याच्या जाणीवेने......
सोबत्याविना सरणावर एकाकी असल्याच्या जाणीवेने......