Monday, August 18, 2008

भूल

आज का काही कळेना, अडखळते पाऊल आहे
शांत शांत सागरामध्ये, वादळाची चाहूल आहे

आप्त माझे तुझीया पायी, मीच का रे पायदळी?
विनवते प्रभुला किती ते, केविलवाणे फुल आहे

आज अडला श्वास देही, प्राण कंठी दाटले
तमा कुणाला जो तो, स्वत:मध्ये मश्गूल आहे

जाळुनी जन्मभरी स्वत:ला, भाजली रे भाकरी
प्रितभरल्या फुंकरीला तरसे, मी विझणारी चूल आहे...

अर्पिले सर्वस्व तुजला, वसविले मनमंदिरी
हात नाही जोडले, हीच माझी भूल आहे?

- अवि

Saturday, April 26, 2008

व्यथा

व्यथा व्यर्थ मनीच्या, कुणा मी सांगणार नाही
हरलेला डाव आता, पुन्हा मी मांडणार नाही

वेडा म्हणा कुणी, मज म्हणा कुणी अभिमानी
पायी उगाच तुमच्या, असा मी रांगणार नाही

घरभेदी म्हणती आप्त, या विभिषण धर्माला
रक्त तुजसाठी तरी, रावणा, मी सांडणार नाही

तुडवतील सहजा सहजी, ते कोवळ्या भावनांना
लक्तरे वेदनांची वेशी, अता मी टांगणार नाही

भोगीन भोग सारे, मी पुण्य सारे विसरुनी
सावळ्या हरीशी तरी, बघा, मी भांडणार नाही

--अवि

Monday, March 17, 2008

प्रेमदिन

प्रेमदिन

रम्य संध्याकाळच्या आपल्या भेटी
सखे मला अजुनही आठवतात
तुझे ते निरागस हसु आठवताना
हळुच माझा गळा दाटवतात

हसत हसत विचारलेले तुझे प्रश्न
ह्रुदयात प्रेमाचे काहुर माजवतात
तिरपा कटाक्ष टाकत दिलेली उत्तरे
तुला अजुनही तितकेच लाजवतात?

थरथरणारे तुझे धुंद श्वास
भोवताली माझ्या जाणवत रहातात
अन राहुन राहुन तुझ्या आठवाने
पापण्यांच्या कडा पाणवत रहातात

तुझ्या प्रितीची मुक साद
सखे मला कळते आहे
माझेही वेडे मन
तव भेटीलागी तळमळते आहे

शहरांत असो अंतर कितीही
मनाने आणखी जवळ येऊया
आजचा हा प्रेमदिन सखे
प्रेमानेच आपण साजरा करुया....
आजचा हा प्रेमदिन सखे
प्रेमानेच आपण साजरा करुया....

--- अविनाश

Wednesday, October 31, 2007

चिरा

चिरा

‌ऋतुमागूनी जाती ‌ऋतु, सर्वस्व परी तुज वाहीन मी
होऊनी निष्पर्ण पिंपळ, बहरता तुज पाहीन मी

दुरावलो जरी आज तुजला, रोष नाही सखे तुजसवे
वेदनांचे घनवादळ झेलित, एकटाच मूक साहीन मी

गुन्हा काय अन अपराध कुणाचा, अर्थ न उरे त्यास काही
मीच इथला फिर्यादी तरी, जामीन तुज राहीन मी

उन्मळून पडलो आज, अन जाहलो बेचिराख जरी
होऊनी खग नवफिनिक्स, पुन्हा उडुन दाविन मी

यशशिखरावरी जल्लोषामध्ये, विसरशिल तु मजला
मनमंदिराच्या पायरीशी तुझिया, एक चिरा प्राचिन मी.....

- अवि

वेदना

वेदना

ढाळू नकोस अश्रु, जरी त्यांसी मोल आहे
तव मधुर हास्य सखे, मजसाठी अनमोल आहे....

तुझ्या मनीची व्यथा, जाणतो मी प्रिये
कसे समजाऊ तुला, इथे तोच माहोल आहे....

असह्य यातना अशा, तुझ्या विरहाच्या किती
तव नयन बाणांचा, हा घाव खोल आहे....

आठवणींचा प्रवास असा, करतो पुन्हा पुन्हा
जाणार तरी कुठे मी, ही धरणी गोल आहे....

मनोमनी सहजीवनाचे, सुखचित्र मी रेखाटतो
प्रितीविना व्यर्थ सारे, सारे कवडीमोल आहे....

--- अविनाश पेठकर

Monday, July 16, 2007

पाऊस

पाऊस

ढग दाटुन येतात
अन तुझी आठवणही
दिशा अंधारुन जातात
तसं माझं मनही

अधिर पावसाला
मग मी समजावु पहातो
पाउसही थोडावेळ
माझं ऐकत रहातो

मित्रा, तु काय नेहमीसारखाच
बेधुंद बरसशिल रे
माझे डोळे मात्र
सखीला पहाण्यासाठी तरसतील रे

प्रियेची वाट पहाणारा
मीही वेडा चातक ना?
प्रेमी जीवांच्या ताटातूटीचे
करनार नाहिस तु पातक ना?

शपथ तुला तुज प्रियेची
तुला आहे प्रितीची आण
सखीच्या विरहाने अथवा
जातील रे माझे प्राण.....

...............................

प्रियेच्या भेटीला मग
हळवा पाउसही तरसतो
अन माझ्यासारखाच तोही
फक्त डोळ्यांतुनच बरसतो...
अन माझ्यासारखाच तोही
फक्त डोळ्यांतुनच बरसतो...

अविनाश

Sunday, February 18, 2007

प्रिती


प्रिती

प्रिती

तुझ्या मुखीचा शब्द मी, अन तुच माझी वाणी गं
तुझ्या सुरांवाचुन अधुरि, सारीच माझी गाणी गं

तुज संगतीत मिळे मज, ग्रिष्मातही सुखद गारवा
तुजविण भासे श्रावण व्यर्थ, टपटपणारे पाणी गं

मिळताच नजर तुजसवे, वर्षति कितिक प्रेमगिते
वळताच नजर विरह पाझरे, ह्रुदयातुन या विराणी गं

राग जरि हा लटका, अनुराग कळेना कसा करु
प्रितित तव गुरफ़टलेला, मी वेडा अज्ञानी गं

मम गझलेचे तुझ्यासवेचे, साम्य कितीक हे सखये
गझल हि जर काव्याची तर, तु मज दिलाची राणी गं!

--अविनाश